Wednesday, October 23, 2013

ध्यान


खरं सांगू का
कविता प्रत्येकानं
लिहिली पाहिजे
कविता म्हणजे
फक्त शब्दांचा
खेळ नसतो
आतून लयीत
येणारा आपलाच
आवाज असतो
ऐकण्या साठी
तुम्हाला शांत
बसावं लागतं
आपल्या आत
डोकवावं लागतं
ध्यान असं मस्तं
लावावं लागतं
ध्यान लागलं
कि जीवन
समृध्द होतं
असं मला खात्रीनं वाटतं
सांगा तुम्हालाही हे पटतं?

-सत्यजित खारकर

Tuesday, October 22, 2013

अनैसर्गिक



उरकून घेण्या सारखा
सुर्यास्त पहायचा
वाघ मागे लागल्या
सारखा किल्ला चढायचा
डोळ्या ऐवजी कॅमेर्यानेच
जास्तं निसर्ग पहायचा
ताजी हवा फुफ्फुसात
भरून घ्यायच्या ऐवजी
बका बका शेंगा खायच्या
वर सतत फोन बघायचा
तेव्हा माझ्या जवळ
अजिबात फिरकू नका
असं त्यांना स्पष्टपणे
समुद्र किनारा म्हणाला

-सत्यजित खारकर

Monday, October 21, 2013

बगळ्या ची भूमिती



सगळ्यांना भावणारी
मना पासून हसवणारी
त्या कवीची ती भन्नाट
कविता त्यानं जेव्हा म्हंटली
तेव्हा जबरदस्त टाळ्या पडल्या
तरुणांनी शिट्या देखील वाजवल्या
मात्र  सगळ्यात पुढे बसलेल्या
बगळ्या सन्मानिताचा चेहरा
आधी षटकोनी मग चौकोनी
होत होत पंचकोनी झाला
कवी मनात म्हणाला,
आऊ! हा माणूस कि भूमितीचे पुस्तक?
नुसताच बघतोय हा टकमक
गम्मत बघा तिथेच त्याला
विनोदी कवितेचा विषय सुचला
पुढची कविता बगळ्याच्या भूमिती वर
असा  निश्चय त्यानं केला
-सत्यजित खारकर

हरामी का चूहा

एका  माणसाने
आपला उंदीर
विकायला काढला
तेव्हा अतोनात
गहजब झाला

हज्जारो  म्हणाले
मुक्या प्राण्यावर
जरा दया करा
नालायक मालक
उंदीर  बिचारा

जेव्हा कळलं कि
तो तर जादूचा उंदीर
मालकाची याच्या
उघडलीये  तकदीर

मग हेच लोक गुपचूप
बोली लावू लागले
आरे ह्ट उंदीर कोण
विकत घेतं का? वरवर
असंही  म्हणू लागले

आश्चर्य,
आता मला हा उंदीर
विकायचाच नाहीये
असं तो माणूस
जाहीर म्हणाला
आणि  आशांचा कित्येक
छीन्न चुराडा झाला

दुरून लोक त्याच्या
महाला कडे पाहतात
हरामी का चूहा
बहोत हि कमाल
असं उद्वेगानं म्हणतात

-सत्यजित खारकर 

Sunday, October 20, 2013

फुकटचंद

शिकागो च्या त्या अवाढव्य
पुस्तकाच्या दुकानात मला
ते गृहस्थ  कायम दिसायचे

मला पाहिल्यावर उदात्त हसायचे
हातातलं पुस्तकं चाळत बसायचे

कुणास ठावूक यंदा ते चक्क माझ्याशी बोलले
आय थिंक यू आर मराठी असं चक्क म्हणाले

ग्रीन कार्ड आहे कि नाही हे पण विचारलं
महाराष्ट्रातून कुठून तुम्ही हे पण झालं

मग जसं माझ्या हातातलं पुस्तक पाहिले
ते पण कवितेचं मग मात्र  जबर दचकले
म्हणाले कवितेचं पुस्तक? वेडे कि काय?
ते पण डॉलर मध्ये विकत घेताय?

अमेरिकेत पहा आज तेरा  वर्षं झाली मला
अप्पा बळवंत चौकात शिकलोय एक कला

आपलं माणूस म्हणून तुम्हाला हे सांगतोय
कवितेचं पुस्तक कोण शहाणा विकत घेतोय?  

कवितेची पुस्तक तशीही असतात छोटीशी
कुणी नाहीये बघून पटापटा पानं उलटायची
उभ्या उभ्या दुकानातच वाचून संपवायची


-सत्यजित खारकर

Wednesday, October 16, 2013

आती क्या खंडाला?

एक फिल्मी कुत्रा
एका कुत्रीला म्हणाला
ए  आती क्या खंडाला?
कुत्री मनात म्हणाली
पहा दम निघना या मुडद्याला
तरी  वेळ हाये अजून पावसाला

कुत्रं  पुन्हा म्हणालं
ए  आती क्या खंडाला?
कुत्री मनात म्हणाली
कशाला? थंडीत हाडं मोडायला?
म्हणे आती क्या खंडाला?

कुत्रं पुन्हा म्हणालं
ऐ आती क्या खंडाला?
कुत्री त्याला म्हणाली
खंडाला तो जायेंगे बादमे
जरा पिछे देख कुत्ते कमीने
आयी म्युन्सिपाल्टी कि गाडी
तेरी मुसक्या आवळणे

-सत्यजित खारकर 

शाळा फुलपाखरांची

लुकलुकत्या डोळ्यांची
मुठीतल्या बोरांची
उमलत्या मनाची 
हरवलेल्या कुणाची
आठवणीतली माझ्या
ती शाळा फुलपाखरांची

ताऱ्यात हरवशील  
पावसात भिजशील
सुरांत रमशील
प्रवासी तू अनंताचा
कधी रे पुन्हा भेटशील?  
विचारत असे मज 
ती शाळा फुलपाखरांची

 -सत्यजित  खारकर

हे माझ्याच बाबतीत का?

काय म्हणालीस?
हे  फक्त तुझ्याच बाबतीत का?
असं एकदा चक्क देवबाप्पा
स्वता:च तिला म्हणाला
तेव्हा तीच चकित झाली
म्हणाली बरं झालं
तुला चक्क वाचा फुटली
बाबारे माझी भक्ती
आज सफल झाली

तसा देव तिला म्हणाला
तुला काय वाटतं?
हे माझ्याच बाबतीत का?
हा काय प्रश्न फक्त तुलाच पडतो ?
जसा तुला पडतो तसा मला ही पडतो
तुला सुखी वाटणाऱ्या सगळ्यांना पडतो
शप्पथ सांगतो ब्रम्हदेवाला हि पडतो

आश्चर्य वाटून ती म्हणाली

रिअली? मग तुम्ही काय करता?
काही नाही एकदम सोप्पं
थोड्या वेळ वाईट वाटतं, वाटू द्यायचं
वाटलं तर पोटभर रडूनही घ्यायचं
मग छानसं काही तरी आठवायचं
बाहेर लोकां मध्ये मस्तं मिसळायचं  
झालं गेलं विसरून जायचं
नव्यानं आपलं गाणं गायचं    
-सत्यजित खारकर 

Saturday, October 12, 2013

फुकट सल्ला

तो बाका तरुण चुकून विसरला
दाढी न करताच बाजारात गेला
पाहून त्याचा तो भकास चेहरा
एकास वाटले प्रेम भंगच झाला

तो तरुणास हलकेच म्हणाला
एवढे लावून नका घेवू मनाला
कशाला यातना देता हृदयाला
एक उपाय सांगतो आपणाला

सर्व पित्री अमावास्येच्या दुपारी
शोधा एक सुरवंट तुम्ही काटेरी
पिंपळाच्या पानात ठेवून सुपारी
सुरवंटास ठेचून दया मग धुरी

तो तरुण`फुलटू अवाक  झाला
तसा  महामानव तो पुढे बोलला
लेप टकलास चोळूनी लावा
मग फक्त चमत्कार बघा
येणार सत्वर केस अन प्रिया

-सत्यजित खारकर

राजू राव

पाहण्याचा कार्यक्रमात
मुलीची आई म्हणाली
ही आमची मुलगी हिरा
फार सुगरण हे टेस्ट करा

मुलगा राजू लाजत बोलला
छानच केला आहे हो शिरा
नसेल हरकत तर आणा जरा

ऐकून दन्न दचकले मुलीचे मामा
अय्यो शिऱ्यास हे म्हणती उपमा

-सत्यजित खारकर 

प्लीज

रंग पाहून उधळावेसे वाटत नाहीत
सूर ऐकून  गावेसे  वाटत नाहीत
गळ्यात पडून रडावेसे वाटत नाहीत
देवा मला असे मित्र
देवू नकोस

शब्दांशी ज्यांना खेळावे वाटत नाही
दर्यात ज्यांना डुंबावे वाटत नाही
पहाड कवेत घ्यावे वाटत नाहीत
देवा मला असे मित्र
देवू नकोस

ढोल ऐकून नाचावे वाटत नाही
पोटभर ज्यांना हसावे वाटत नाही
एकदाही चावट बोलावेसे वाटत नाही
देवा मला असे मित्र
देवू नकोस
 
प्लीज

-सत्यजित खारकर  

जोडीदार

ती त्याला म्हणाली
तू मस्तंच नाच केलास
मोरा सारखा थुई थुई
नाचलास आणि खरं
सांगू तिथच मला तू
आवडलास  

गरबा खेळताना
हाताची घडी
कपाळावर आठी
काय हे कशा साठी?  
असा भाव आणत
कडेला उभी माणसं
पाहिली आहेत मी
नशीब तू तसा नाहीस
नाही तर जीवनगाणं
किती निरस झालं असतं

-सत्यजित खारकर

बाळांच सर्वात आवडतं गाणं

उलू मिलू बूबू पिलू
चिकू मिकु उची मुलू
गुबू गुबू गालू गालू
मिची मिची डोळे गोलू

इम्बू चींबू टिमी टिंबू
बोबो शीशी कीशी मिशी
इशी बिशी जीजी किशी
हाकू बाकू टिकू टीशी

पीपी पिशी कोशी बोशी
मिमी उशी मोशी मोशी
लालू लालू गोडू  गालू
पप्पी पप्पी गोडू गोलू    

माऊ माऊ बीबी टाऊ  
मंजू मंजू गोडू माऊ
हाकू शिकू  हाकू शिकू
गोडू  गालू पप्पी घेवू

-सत्यजित खारकर


 

     

Friday, October 11, 2013

काय म्हणावं आता या बाईला?

ते कधीच कुणाला चांगलं
म्हणत नसतात
सगळे सिनेमे कविता
गाणी लेख माणसं
त्यांच्या मते फालतू असतात

हे कशाला करायचं
ते कशाला करायचं
ह्याचा काय फायदा
त्याचा काय फायदा
ह्यात काय विशेष
हेच पालुपद सतत
उगाळत बसतात

कंटाळून एकदा त्यांना बायकोने
एक कडक जाळ थप्पड लगावली
आरशात बघत साहेब म्हणाले
मूर्ख बेअक्कल गाढव कुठली
ही काय मारायची पध्धत झाली?

एक वळ सुध्धा नाही उमटला
काय म्हणावं आता या बाईला?  


-सत्यजित खारकर 

मटण करी

एक कोंबडी तुरु तुरु
निघाली टेचात
घालून गॉगल म्हणे
दुनिया गेली खुराड्यात

बघतेच कोण करतं
माझी चिकन करी
घालतेच डोक्यात अंडी
जरा हात लावून पहा तरी

पाहून कोंबडीचा आवेश
एक मेंढी जागीच थिजली
हार्ट फेल होवून खटाक मेली
तिची मग मटण करी झाली

-सत्यजित खारकर

परदेश

इथला प्रत्येक माणूस
तसा सारखाच  असतो
घराची आठवण काढून
तळमळत असतो

तिथली गाणी तिथले सण
मातीचा वास ते बालपण
तिथल्या आठवणी
आपल्या आत घेवून
रोज जगत असतो

सगळेच इथं थोडेसे कोलंबस
रोज नवं जग शोधत असतात
रात्री झोपताना मात्र
यारा घर राहिलं दूर म्हणतात

- सत्यजित खारकर






गाठ


दोन आडमुठ रस्ते
एकदा आडवे आले
एकमेकांच्या

सुंदोपसुंदी झाली
शिवीगाळ झाली
कुणीच मागे हटेना

हा म्हणे  माझ्या बापाचा
तर तो ही  म्हणे माझ्या बा चा
मी रस्ता

एका शहाण्या माणसानं
दोघांची धरून गुच्चि
मारली गाठ
आणि
दिला ठोकून एक पुतळा
कुणा भल्या संताचा
मधोमध

आता लाखो लोक रोज
पायदळी तुडवतात
त्या अवाक गुंत्याला
ज्याला म्हणतात
शांती चौक


-सत्यजित खारकर 

Thursday, October 10, 2013

संध्याकाळ रुसली

एक संध्याकाळ हिरमुसली
तळ्यात पाय टाकून बसली
पाहून तिला विचारी शहाणं झाडं
बाई साहेब व्हाय आर यू सो सॅड?

संध्याकाळ म्हणाली,
तुम्ही विचारता म्हणून सांगते
आज आहे कुणा एकीचा बर्थडे
गेलेत विसरून सगळे स्पेशल डे?

झाड म्हणालं अगदी खरं आहे
तुला राग येणं स्वाभाविक आहे
चष्मा माझा पडलाय तळ्यात
नीटसं दिसत नाही मला अंधारात
पण एकदा पहा ना आकाशात

तिनं मग हळूच वर पाहिलं

क्षितिजा वर चंद्र उगवतो जिथे
चांदण्यांनी लिहिलं होतं तिथे
संध्या राणी हँप्पी बर्थ डे !

रुसली संध्याकाळ खुदकन हसली
तळ्यात दोन कमळं उमलली  

-सत्यजित खारकर 

Monday, October 7, 2013

रडत बसण्यात काहीच अर्थ नाही


रडत बसण्यात मित्रा काहीच अर्थ नाही
कारण असा जन्म पुन्हा मिळणार नाही
मान्य असतील काही भंगली स्वप्नं तुझी
मात्र सूर्य त्यानं उगवायचा थांबणार नाही

मी मी म्हणणारे आले अन तिथेच गेले
काहीना दोन अश्रू बहुतेक कोरडेच मेले
उठ आता पूस डोळे, घे श्वास उरांत भरून
मार भरारी आकाशात नव्याने पंख पसरून

असेल धैर्य अन मनगटात ताकद
काय कठीण भेदणे हिमालय पर्वत?
शंका कुशंका फुसक्या भीत्या, जळमटे रे मनाची
कुचकामी लक्तरे नीच ती जाळून टाक कायमची


-सत्यजित खारकर        

Saturday, October 5, 2013

देशभक्त


सर्वत्र कचरा
दोष दुसऱ्याचा
दोष कचऱ्याचा
हमखास

खावे नि थुंकावे
जोरात बोलावे
जणू कि भांडावे
सार्वत्रिक

सिग्नल तोडावे
हॉर्न वाजवावे
शत्रू समजावे
इतरास

मधेच घुसाकी
रांग हि कुणाची?
आपुल्या बापाची
समजावी

निवडून द्यावे
गुन्हेगार नेते
भुरटे चोरटे
बिनधास्त

देशभक्त मीच
बाकी सारे नीच
अंतरी सदाच
भाव हाच

-सत्यजित खारकर  

घाल लाथ पेकाटात

मनी अकारण
उफाळता भीती
खुंटली  प्रगती
समजावी

उज्वल भविष्य
दिसते अंतरी
अनाठायी तरी
भीती का रे?

करू नको करू
द्विधा मनस्थिती
हतबल किती
तुज वाटे

होईल ते पाहू
पडू उभे राहू
स्वत: साठी जगू
आयुष्यात

वटारते  डोळे
भीती हि फुसकी
लाथ एक दे की
पेकाटात

-सत्यजित खारकर



"मै हू घनचक्कर"



महा सिनेटीकाकार भुजंगराव खवीस 
रोज नेमाने झोडीत दिग्दर्शक बावीस  

बघा सगळे साले सिनेमे रद्दी भिकार 
महा मक्कार अति बेकार फार टुकार 

आधी करावे मग सांगावे म्हणती संत सारे 
करून दाखवावे म्हणतो यंदा त्यांचे बोल खरे 

आता मीच काढतो एक सिनेमा जबर
दिग्दर्शनाची सुवर्ण धुरा घेतो खांद्यावर    

मिळवीन मी सहज  दहा पंधरा ऑस्कर
माझ्या सिनेमाचे नाव "मै हू घनचक्कर"   

भुजंगरावांनी मग घर दार शेती वाडी विकून
आपल्याच लेखातील सर्व नामी उपदेश वाचून 
महत्प्रयासाने कसाबसा सिनेमा पूर्ण केला 
मना सारखा झाल्याने त्यांना फार हर्ष झाला

आश्चर्य बघा  प्रेक्षकांनी त्यास पार झोपवला  
उरलेला मित्र टीकाकारांनी वाभाडून संपवला 

आज दहा वर्ष झाले बघा या गोष्टीला 
भुजंगराव कर्जाचे हप्ते भरत असतात 
सगळेच टीकाकार प्रामाणिक नसतात 
असं डोसा ओर्डर घेताना पुटपुटतात 
-सत्यजित खारकर