Thursday, November 28, 2013

प्रार्थना एक सोपी

स्वर तुझे गीतास लाभूदेत आता
एक दास्ता जगास ऐकूदेत आता
तप्त निखारे न इथे सावली कणभर
दाह्ले पाय क्षणभर निवूदेत आता
कासावीस फुले कितीक केविलवाणी
हसरी गाणी मनात फुलूदेत आता
पहा एक मंदिर म्हण प्रार्थना सोपी
शांतता जन मनास लाभूदेत आता
भेटीले मज ध्यास आजन्म घेतला
भरूनी डोळे मजला पाहूदेत आता
-सत्यजित खारकर

Friday, November 22, 2013

चांद ओला ओला

चांद ओला ओला रे
पानं ओली ओली रे
नभ भुई ओलावलं
ओली रेख काया रे

ओली फुलं वाटा रे
ओली ओली धार रे
ओला गंध आला रे
अत्तराचा फाया रे

ओथंबले बघ मन रे
भिजलेले बघ तन रे
उन्हावर पावसाची
ओली ओली साय रे

ओल्या श्रावणात रे
येडं सपान भिजं रे
थंडी गींडी न लागू
धरी झाडी छाया रे

जराशीच उघडीप रे
गपगार रीप रीप रे
लगाबगा रे पहा निघ
ओल्या मोळ्या दोन रे


-सत्यजित खारकर

शब्द शब्द सुटा सुटा

शब्द शब्द सुटा सुटा तोडीत बसले
काही शहाणे कविता मोडीत बसले

लग्ने युती अभद्र सत्तेसाठी नव्याने
लाखो भुजंग मुंगुस गोडीत बसले

खोदला पहाडात कुणी रस्ता एकाने
नामर्द कोपऱ्यात खडे फोडीत बसले

कुणी भविष्य देख उराशी कवटाळले
रडे लक्तरे पुराणी जोडीत बसले

जिगरबाज दर्या फिरून सारे आले
कलमबाज तर्र कागदी होडीत बसले

-सत्यजित खारकर

मनस्वी पीर

सौजन्य दाखवताच इथे दुबळे ठरवतात मला
येथे पोंगे पंडीत काही मनसोक्त हसवतात मला

गात धून आपुलीच मनस्वी पीर निघूनी गेला
जिंकले लाख किताब पण ते स्वर हरवतात मला

जिगर ही अशी की झरे फुटावे खड्या फत्तराला
कथा शूर शिवरायाच्या आजही रमवतात मला

कोण म्हणाले उगाच जिभ लावू नये टाळ्याला
या सत्य असत्याच्या धूसर सीमा फसवतात मला

असले कसले कायदे? आम्ही सांगा तुम्ही बदला
झोपलेले न्यायाधीश दोषीच ठरवतात मला
-सत्यजित खारकर

कळ्या


काही-बाही बघ चोरून पाहतात कळ्या
दवांना रोज चुम्बावे चाहतात कळ्या

कुणाचीही आरती कशालाही टाळ्या
फुले असली तरी खुशाल वाहती कळ्या

वेणीत माळता अश्रू पाकळीच्या डोळ्या
करुण वेदना सावळी साहतात कळ्या

लबाड चांद लपे पहा ढगा मागे काळ्या
निळ्या जळात बेफिकीर नाहतात कळ्या

महेफिल संपली उरल्या चार पाकोळ्या
चुरगाळल्या गजर्यात मग दाहतात कळ्या

-सत्यजित खारकर