Wednesday, February 29, 2012

ही रात नशीली

ही रात नशीली नशीली नशीली आहे ..

दर्या वरी आलंय तुफान
सावध हो तू जर्रा
सावज येता जाळ्यात
फास टाक गळ्यात
सोडू नको हा तू मौका
सोडू नको हा तू मौका

ही रात नशीली नशीली नशीली आहे ..

अरे पैशाची दुनिया सारी
नोटावाल्याला सलाम करी
खरं नको बोलू , दिल नको खोलू
हि दुनिया है बेईमानाची
हि दुनिया है बेईमानाची

ही रात नशीली नशीली नशीली आहे ..

किती आले किती गेले
घालून खोटे मुखवटे
याराचा यार तू राजा दिलदार तू
ओळख खरे कोण खोटे ?
ओळख खरे कोण खोटे ?

ही रात नशीली नशीली नशीली आहे ..
ही रात नशीली नशीली नशीली आहे ..

-सत्यजित खारकर

सुन प्यारे फकीर कि बात..

होवून गेलं जे पण झालं
कसं झालं का असं झालं
सोड चिंता होणार होतं
एका झटक्यात होवून गेलं
याला जीवन ऐसे नाव
याला जीवन ऐसे नाव...

गेलां क्षणं येणार नाय
होणार जे बदलत नाय
गेलं सोडून परत नाय
तुझं ते रूकणार नाय
आपली दोरी त्याच्या हाती
अंतरिक्षात तू एक बिंदू
तुझ्या हाती कायपण नाय
का? चं उत्तर ग्यारंटी नाय
याला जीवन ऐसे नाव
याला जीवन ऐसे नाव...


आलास तू घेवून काय ?
करवंटी पण नेणार नाय
कित्येक आले कित्येक गेले
सोबत कुणी काय नेले ?
जीवन एक गोरखधंदा
समज प्यारे ये तू फंडा
फकीर कि बात रख तू याद
रोती सुरत जिंदगी बरबाद
हा जो क्षण तोच खरा
हसरा ठेव हा चेहरा

याला जीवन ऐसे नाव
याला जीवन ऐसे नाव....
-सत्यजित खारकर

सुपरस्टार बोकोबा

जय सुपरस्टार बोकोबा
शून्य एक्टिंग दांडगोबा
पोरी बाळींचा म्हणे चांदोबा
बोकोबा बोलो जय बोकोबा


एकदा काय गम्मत झाली
बोकोबां ची दाढी वाढली
ओठात धरुनी बीडी अर्धी
सर्कॅले धुरांची ऐटीत सोडली

लोके भवती रिकाम टेकडी
वल्लाह आपकी सुबक दाढी!
ब्रेकिंग न्यूज , चर्चा सत्रे
पहला प्यार अक्टिंग या दाढी ?

देशा मध्ये वणवा पेटला
घोटाळ्यांना देश विसरला
धूर्त पत्रकार प्रश्न विचारी
ऑस्करची तर ही नसे तयारी ?

पाहून हा भरभराट (बोकोबांचा)
झाला हो जळफळाट
एका लांब केसाच्या दालींदर नटाचा

कलियुग आहे दुसरे काय?
असून टक्कल अन बेअक्कल
छटाक दाढी superstar जाहला

-सत्यजित खारकर

निळ्या आभाळाचं गाणं

निळ्या आभाळाचं गाणं,
गाणं आलं माझ्या ओठी
झाडं पानं फुलं हसती कुणा साठी ?

ऐकून माझं गाणं इवली फुलं हसली
अरे पोर शानी शानी कशी ही बहकली

निळ्या आभाळाचं गाणं,
गाणं आलं माझ्या ओठी
झाडं पानं फुलं हसती कुणा साठी ?

भोळ्या सख्या चांदण्यांनी गुपित हे उधळले
येडं मनं येडं आभाळं लाजून चूर झाले

निळ्या आभाळाचं गाणं,
गाणं आलं माझ्या ओठी
झाडं पानं फुलं हसती कुणा साठी ?
- सत्यजित खारकर

आई

फिरवतेस हात पाठी वरुनी
डोळ्यात येई पाणी
कसे उमगते सांग तुला
आई न सांगताच कोणी ?

थकून खेळ जगण्याचा
अवचित घरी मी येतो
स्पर्श तुझ्या हातांचा
सल माझे नीवळतो

घरटे सोडून झेपावताना
होते पंख थरथरले
घेत भरारी कोसळतं
विश्व कितीक गवसले

दूर आभाळातळी होते
एक खुशाल घरटे
निजवता तिथे पिलांना
कहाणी आई सांगे

भय वाटता कधी अंधाराचे
मिटून डोळे आठवतो
गोड गोष्ट जुनी पुराणी
आई ची माझ्या कहाणी

-सत्यजित खारकर

क्षणफुला

क्षणफुला क्षणफुला 
चल आज खेळू  आठवांचा झुला 

संतत धार पावसाची 
मनही आज ओथंबले 
मुक्या सुन्या आभाळाने 
पैंजण मला बांधले 
पैंजण मला बांधले, बेभान मी नाचले  

क्षणफुला क्षणफुला 
चल आज खेळू  आठवांचा झुला 

खोल खोल अंधारात 
भोळे सूर हरवूनी गेले 
एका कळीला स्वप्नात 
तेच सूर सापडले 
कळी मीच होते 
कळी मीच होते माझे गाणे गाते 

क्षणफुला क्षणफुला 
चल आज खेळू  आठवांचा झुला 

- सत्यजित खारकर 

मनं माझे , मनं तुझे

Beautiful Girl !

Tuesday, February 28, 2012

मी हुशार असण्याची फार शक्यता आहे

जरी मी आत्ता वर्गा बाहेर अंगठे धरून उभा आहे

तरी खरच सांगतो मी हुशार असण्याची फार शक्यता आहे

कोण म्हणत असं ?

अं फारसं कुणी नाही पण आई मात्र म्हणते बुवा

नाही झालं काय की भूगोलाच्या तासाला मी

अणू रेणू चा विचार करत होतो , अगदी केंद्रकाचा सुध्धा ..

हात वर करून तंद्रीत गुरुजीना म्हणालो , मास्तर असं तर नसेल ?

तसे गुरुजी म्हणाले बोला आईनष्टाईन बोला..

समजा आपली पृथ्वी म्हणजे इलेक्ट्रोन कुठल्या तरी अज्ञात केद्रकाचा

विचार करा , आरशा समोर आरसे ठेवल्या सारखा

आख्खी आकाशगंगाच ज्याची अणू आहे असा एक रेणू

मग नेमके आपण कोण आहोत इलेक्ट्रोन मधली माणसं ?

मास्तर एकदम स्तब्ध झाले , आणी वर्ग मित्र आनंदी

ढेन टे ढेन SSSS ...दे मार सिनेमा सुरु ..

मास्तरनी डोळे गरागरा फिरवले ते हुप्प्या माकडा सारखे लाल झाले

बायको चा सगळा राग माझ्या माझ्या पाठी वर काढला

मारायचा कंटाळा आल्या वर अंगठे धरून वर्गा बाहेर उभा केला ..

अरे हुडूत असल्या मास्तरड्याला भिक नाही घालत आपण

खरं म्हणजे वर्गा बाहेरच खरी मज्जा असते

८ वी फ च्या वर्गा मधली इथून हिरवळ झकास दिसते ..

एनी वेज मुद्दा हा आहे की ,

जरी मी आत्ता वर्गा बाहेर अंगठे धरून उभा आहे

तरी खरच सांगतो मी हुशार असण्याची फार शक्यता आहे !

-सत्यजित खारकर

राजकारण

गावात होते दोन पुढारी नेते टगे

जीवघेणी स्पर्धा चाले दोघां मध्ये

एक होते जातिवंत माकड

तर दुसरे अस्सल बोकड

माकाडोबानी केली चतुर राजकीय खेळी

परदेश दौऱ्या वर होते बोकडोबा त्या वेळी

घेतली तातडीची पत्रकार सभा , म्हणाले लोकोहो निट बघा

कंटाळा आलाय मला माननीय बोकडजींच्या टुकार पॉलीसीजचा

निषेधा दाखल त्याग करत आहे मी माझ्या अक्कडबाज मिशीचा

दाटल्या अंतकरणाने माकडजीनी स्वहस्ते स्वमिशी अलगद छाटली

तत्क्षणी चेहरा सोडून आनंदाने मिशी तरंगत भूई वर आली

मिशी कापल्याचा बातमीचा वणवा पाहता पाहता गल्ली ते दिल्ली पसरला

एव्हढा कि महाराजा देश काही काळ चक्क क्रिकेट ला पण विसरला

माकाडोबाच्या अभूतपूर्व चालीचा बोकडाच्या खुर्चीला चांगलाच दणका बसला

तातडीच्या संदेशात पक्ष श्रेष्ठींनी त्यांचा राजीनामा विनाविलंब मागवला

माकाडोबानी परत येताच विमानतळावरच राजकीय युद्धाचा शंख फुंकला

म्हणाले मान्य बर्याच दिवसात कुणी असा धोबी पछाड नाही दिला मला

पण याद रहे मित्रहो मी पण नाही काही कच्या गुरूचा चेला

बोलता बोलता करा करा त्यानी हनुवटी खाजवली

आणि काय चमत्कार बोकाडोबाना जबरदस्त युक्तीच सुचली

अब आयेगा खेळ का मजा

असं मनात म्हणत त्यांनी

तिथेच एक सनसनाटी घोषणा केली

न्याय मिळवण्या साठी एकच पर्याय

हा पठ्ठा दाढी अजिबात कापणार नाय

दाढी दिल्ली पर्यंत लांब वाढवणार हाय

जोर से बोलो मिशी का जवाब दाsssढीसे

बोकडजी च्या दाढीची चर्चा घरी दारी झाली

कुणी म्हणालं दाढी आज आग्र्या पर्यंत आली

ब्रेकिंग न्यूज याने कि आज कि ताजा खबर

गल्ली से दिल्ली एक मासूम कि दाढी का सफर

या खेळीने बोकाडोबाची मग एकदम चांदी झाली

माकाडोजीच्या तिप्पट publicity झाली

माकडाची मिशी बिचारी विनाकारणच शहीद झाली

-सत्यजित खारकर

कभी कभी..

कभी कभी मेरे हिंदुस्तानी दिल में खयाल आता है
कि फुक्कट खाणे वालो को भी तो मज्जाच आता है
बिना तिकीट वालों को, घोटाळा करणे वालों को
दंगा करणे वालों को भी तो मज्जाच आता हैं
फिर क्यो बजाये हम शहनाई सच्चाई कि रातोमे?
कभी कभी मेरे दिल में खयाल आता है कि
बस क्या यार सत्या, तेरे दिलमे कुछभी खयाल आता है ...
-सत्यजित खारकर

मनातलं गाणं

योग्य काना, मात्रा, वेलांटी, उकार

नेमका शब्द, योग्य वेळ, गेला बाजार मूड

याला काय वाटेल, तो काय म्हणेल , मला कोण हसेल

कवितेचा वि ह्रस्व की दीर्घ ?

या सगळ्या वैचारिक गोंधळात वर्षा मागून वर्ष गेली

मनातला गाणं त्यांच्या मनातच राहिलं
हळू हळू हिरवं गार पान पार सुकून गेलं

आताशा ते फक्त बोचरी टीका करतात
मात्र कविता वाचनाच्या प्रत्येक कार्यक्रमाला आवर्जून जातात ..

-सत्यजित खारकर

Empty nest syndrome

अंधारल्या वाटा गाई घरी आल्या
मावळतीच्या आशा पापण्या ओल्या
काल तिचं पाखरू उडालं उंच आभाळात
दूर भिरभिरंत गेलं सार्या आसमंतात
उडाया शिकविले तिनंच पाखरा
मग का होई तिचा जीव असा घाबरा?

-सत्यजित खारकर

साभार परत

पाण्याचा प्रश्न निट मांडला म्हणून काय झाले ?

तुमच्या कविते मध्ये दुर्बोध शब्द नाहीत

अबोध वाक्य नाहीत ..

अनाकलनीय शब्दांची गुंफण - ती सुध्धा नाही

त्या मुळे माफ करा कवी महाशय

तुमची कविता श्रेष्ठ्त्वा च्या चौकटीत बसत नाही

-सत्यजित खारकर

थोडक्यात कमी पडण्याची गोष्ट..

आमचा बालमित्र, डॉक्टर बबन तसा नेक आहे

संशोधना व्यतिरिक्त फावल्या वेळी

गप्पां आणि दारू च्या बाबतीत चोख आहे..

एकदा अशाच एका रमणीय पार्टीत

बबन म्हणाला - लोकहो, 'नीट' घेतोय नीट ऐका

-साला, मार्क थोडेसे जास्त पडायला हवे होते..

-घर थोडंस मोठं हवं होतं ..

-पगार थोडासा जास्त हवा होता..

-किंमत थोडीशी कमी हवी होती ..

-नशीबानं थोडीशी साथ द्यायला हवी होती ..

सांगा नाही वाटत अजिबात ज्याला

असा सर्व जगी कोण आहे ?

बबन म्हणे मानवा तूच हे शोधूनी पाहे ..

मित्रानो गुरुत्वाकार्षणा सारखाच हा पण एक अदृश्य फीनोमिनोन आहे

नोबेल पारीतोषिका साठी यंदा हा माझा शोध देशाच्यावतीने पाठवीत आहे..

(इथे डॉक्टर साहेब पेग भरण्या साठी बोलायचे एकदाचे थांबले)

बबन पाचवा पेग भरतोय पाहून सर्वांच्या वतीने मी म्हणालो

बबन्या लेका तुझ्यातल्या न्यूटनचा आम्हाला अभिमान आहे

काहीतरी सदा थोडक्यात कमी पडणे हा नियतीचा क्रूर शाप आहे

आता हेच बघ ना -

आम्हाला चाटा मारून आख्खी बाटली तू संपवणार हे साफ आहे..

-सत्यजित खारकर

गोरो मॅँनिया

तो जन्माने गाढव , रंगाने काळा आणि बुद्धी ने हुशार होता

त्याच्या बायकोच्या मते तेजस्वी सुध्धा

बायको चटपटीत , त्याला अगदी साजेशी

मुलगी तिच्या आई बाबा सारखीच देखणी

मोअर ओव्हर शी वॉज अत्तिशय गुणी

शेपटी याने के टेल तिला फार शोभून दिसे

सुरेल गाणं म्हणताना ती गोsssड हसे

एका रात्री ते तिघे जेवायला बसले

सुख दुख्खाच्या गोष्टी करत पोटभर हसले

मग अचानक आठवून मुलगी म्हणाली

आई बाबा एक गोष्ट तुम्हाला सांगायचीच राहिली

कॉलेजातून येताना मी चौकात एक मज्जा पहिली

एका विक्रेत्याच्या भोवती होती भली मोठी गर्दी

म्हणे "गोरो मॅँनिया" च्या गोळ्या आल्या सेल वरती

"गोरो मॅँनिया" म्हणजे काय ?

माहित नाही ना ? सांगू ? एकदम सोप्पं ..

काही माणसांना म्हणे डेसपरेटली गोरं व्हावसं वाटतं

या गोळ्या हे वेड अजिबात कमी करतं

फेअरनेस क्रीम पेक्षा हे म्हणे स्वस्त पडतं

तिच्या आई बाबांनी एकमेका कडे अर्थपूर्ण पहिले

मग तिच्या बाबांनी तिला मिश्कील पणे विचारले

मग तू काय विकत घेतलेस क्रीम कि गोळ्या ?

टेल उडवीत ती चिमुरडी म्हणाली

काय हो बाबा सारखं चिडवत असता मला

एव्हढं कळतं म्हंटलं तुमच्या लेकीला

आणि असला फालतू कॉम्पलेक्स यायला, मला काय माणूस समजला ?

-सत्यजित खारकर

खेळ मनाचा

अचानक फोन वाजताना वाटतं कि

हा फोन वाजणार हे एक क्षण

आधीच जाणवलं होत !

हा भास की हा फक्त मनाचा खेळ ?

सांगा होतं ना कधी कधी असं?



सध्या जे चाललय, हा क्षण, हा प्रसंग

पूर्वीच आपण कुठे तरी पाहिलाय

स्वप्नात, कि पूर्वजन्मी, कि हा पण कल्पनेचाच खेळ ?

सांगा होतं ना कधी कधी असं?



एखादा चेहरा , आवाज खूप ओळखीचा वाटतो

पण त्यांना तर आयुष्यात पहिल्यांदाच भेटत असतो

मग ऋणानुबंध असल्या सारखं का भासतं ?

सांगा होतं ना कधी कधी असं?



दोघांच्या ही मनात एकाच वेळी तोच विचार येतो

एकाच वेळी आपण तेच वाक्य बोलतो

गंमत वाटून मग दोघंही हसतो ..

सांगा होतं ना कधी कधी असं?

-सत्यजित खारकर

आठवण

तिच्या दुख्खाचा किनारा
गहिऱ्या आठवानी ओला
मुक्या वाळूत उमटल्या
कितीक पाउल खुणा

घेता डोळे मिटून सये
सांग कोण आत बोलते
रित्या मनी छानसे
गाणे कोण फुलवते ?

अंश तू जयाचा
ते जाई न कुठे
खोल खोल आत
तुझ्या मना मध्ये

-सत्यजित खारकर

फेसबुक बालगीत

१) दुपारचा वाजला एक

पोस्ट केला जोक

कॉमेंट्स वाचण्यात एक तास गेला

मी नाही अभ्यास केला....

२) दुपारचे वाजले दोन

पहा ऑनलाइन आहे कोणं ?

कोणकोण आहे बघण्यात एक तास गेला

मी नाही अभ्यास केला....

३) दुपारचे वाजले तीन

लिंक्स दिसल्या नवीन

क्लिक क्लिक करण्यात एक तास गेला

मी नाही अभ्यास केला....

४) दुपारचे वाजले चार

मेसेजेस आले फार

उत्तर देण्यात एक तास गेला

मी नाही अभ्यास केला....

५) संध्याकाळचे वाजले पाच

पोस्ट वाचल्या जुन्याच

पोस्ट वाचण्यात एक तास गेला

मी नाही अभ्यास केला....

६) संध्याकाळचे वाजले सहा

ऑनलाइन फ्रेंड दहा

चाटींग करण्यात एक तास गेला

मी नाही अभ्यास केला....

७) संध्याकाळचे वाजले सात

स्पेशल माझा दही भात

रेसिपी पोस्ट करण्यात एक तास गेला

मी नाही अभ्यास केला....

८) रात्रीचे वाजले आठ

फ्रेन्डशिप रीक्वेस्ट साठ

रीक्वेस्ट बघण्यात एकतास गेला

मी नाही अभ्यास केला....

९) रात्रीचे वाजले नऊ

वॉल पोस्ट टाकली आगावू

फिदी फिदी हसण्यात एकतास गेला

मी नाही अभ्यास केला....

१०) रात्रीचे वाजले दहा

ऑनलाइन कोण कोण पहा

पाहण्या पाहण्यात एकतास गेला

मी नाही अभ्यास केला....

११) रात्रीचे वाजले अकरा

बाब्याला झाला छोकरा

फोटो पाहण्यात एक तास गेला

मी नाही अभ्यास केला....

१२) रात्रीचे वाजले बारा

बर्थडे नोटीफीकेशन तेरा
शुभेच्छा देण्यात एक तास गेला

मी नाही अभ्यास केला....

-सत्यजित खारकर