Monday, April 15, 2013

शेमलेस लव्ह बर्डस

पाडगावकरांची "प्रेम म्हणजे प्रेम असतं" 
कविता आमचे सर अगदी 
तल्लीन होवून शिकवतात.

तुमचं अन आमचं सेSSम असतं 
म्हणताना "ते" दिवस आठवून  सरजी  
कधी भावूक तर कधी लाले लाल होतात

लेकांनो अर्धं अर्धं चोकोलेट खाल्लं आहे का कधी?
पावसात सोबतीने भिजला आहेत का कधी? 
अरे तुमच्या पिढीला बुडलेली होडी कळणार कशी?
लाटां वर बेभान होवून नाचणं शिका आधी

(अचानक मागच्या बाका कडे लक्ष जावून )
इकडे जीव तोडून प्रेम कविता मी  शिकवतोय
अन हा बबन्या बाबी ला वर्गात चिठ्या पाठवतोय 
 

अरे गाढवानो पाडगावकर तुम्हाला कळणार कधी?    
शेमलेस लव्ह बर्डस गेट आवूट व्हा आधी!


-सत्यजित खारकर 

 

आवशीची हिर

आवशीच्या दाद्ल्यानं
गावाच्या हिरीत जीव दिला अन
लोकांनी अवशीलाच बोल लावला
आता जित्या लोकांनी पानी
पियाला जायचं  कुटं? 
गावात एकच हीर
अन ह्याला मरायला
हीच जागा  सापडली

मंत्र धुपारे करून
हिर पवित्र केली
लोकं पुन्हा पाणी
पिवू लागलं

आत्ता वीस वर्ष उलटली
हिरी ला लोक आवशीची हिर म्हणतात
पिशी आवशी रोज हिरी च्या काठी
कवडश्याशी बोलत बसती
तिचा दादला तिला नवी साडी
घ्यायला मुंबै ला गेला म्हणती

-सत्यजित खारकर 

Tuesday, April 9, 2013

आठवणी


आठवणी
कधी डोळ्यातले पाणी
कधी चांदण्यातली गाणी
कधी धूसर धुके
कधी दीर्घ उसासे... आठवणी

आठवणी
वाळूतल्या रेषा
अबोल भाषा
उमलती स्वप्ने
पापण्यात माझ्या ... आठवणी

आठवणी
पक्ष्यांची माळ
निळ्या आकाशात
तशा विहरतात 
हृदय अवकाशात  ... आठवणी

-सत्यजित खारकर