Tuesday, June 18, 2013

पियानो

कित्येकदा पहाटे 
बंद दारा मागून 
तुझ्या पियानो चे 
सूर मला ऐकू येतात

तुझा पियानो  
जेव्हा गातो तेव्हा 
तुझ्या इतकाच   
माझाही जीव व्याकूळ होतो 

तुझं बरं आहे 
दुख्खाच तुझ्या 
गाणं  तरी होतं
काही लोक इतके
नशीबवान नसतात 
कारण त्यांच्या कडे 
जादूचे हात  नसतात   

-सत्यजित खारकर 

   

चम चम परी

गेली कुठे ती कळी?
हसरी नि लाजरी 
सोन साजरी 

वाऱ्या संगे डोलणारी 
गोड गोड हसणारी 
इवलीशी सानुली  

डोळ्यांनी बोलणारी 
गाल फुगवणारी 
चम चम परी 
नाजूक सरी 
कळी माझी  
छकुली
गेली कुठेशी?

-सत्यजित खारकर 





क्रांती


लावूनी आग पावसाला 
जेव्हा वीर ते निघाले   
रक्त पिपासू खेकड्यांचे    
भेसूर चेहरे जळाले 

अन्याय फुका पचवीला 
आजन्म  पामरांनी 
मदांध सत्ता शोषिते
आक्रोश हा चवीनी 

जग चालले कुठे?  
खातात प्रगती कशाशी? 
मेंदूतल्या बुडबुड्यात ह्यांच्या  
प्राचीन हवा दीनवाणी 

सौजन्य आमुचे सज्जन   
नसे कमकुवत लक्षण 
तळपता तलवार ही भवानी   
पळाले जहाल विंचू अनवाणी 

-सत्यजित खारकर 


Thursday, June 13, 2013

बी फॉर बुडबुडा

हवेत बुडबुडा
बुडबुड्यात हवा
हवेत डोकं
डोक्यात हवा

तोंडाची पिपाणी
पांचट फुंकणी 
बुडबुड् फव्वारा
हवेत पसारा

असंख्य बुडबुडे
कृतीशून्य चौघडे
डोक्यात निपजले
हवेत गचकले

-सत्यजित खारकर