Showing posts with label गझल. Show all posts
Showing posts with label गझल. Show all posts

Monday, December 2, 2013

एक हात माझ्या हाती

वेडावल्या चांदण्या बघ या धुंद राती
पुन्हा एकदा दे ना हात माझ्या हाती
जे काल चुकले ते नाशिले तारुण्य होते
बहकलो येता रेशमी हात माझ्या हाती
उसासे हळूच चोरून पाहणे सोड ना
बहाणे कशाला दे हात माझ्या हाती
होणार ते घडू दे जमान्यास जळू दे
दाहे प्राजक्त दे हात माझ्या हाती
जगलो खुळाच जसे कि वैरीच स्वताचा
जन्मलो येताच एक हात माझ्या हाती
-सत्यजित खारकर

सर्कस

वेशीवर तसाच रुसतो मी
वळून पापण्या पुसतो मी
सापशिडी खेळ जगण्याचा
गारुडी बनूनी हसतो मी
मी न दिली तुला फोल वचने
कळेना का खोल फसतो मी?
सलती काटे दिवसभराचे
रात्र सारी लिहित बसतो मी
सर्कस हा खेळ जगण्याचा
असा मजेत बघत असतो मी
लुभावतात मज सूर दैवी
मेहफिलीत तशा दिसतो मी
-सत्यजित खारकर

Thursday, November 28, 2013

प्रार्थना एक सोपी

स्वर तुझे गीतास लाभूदेत आता
एक दास्ता जगास ऐकूदेत आता
तप्त निखारे न इथे सावली कणभर
दाह्ले पाय क्षणभर निवूदेत आता
कासावीस फुले कितीक केविलवाणी
हसरी गाणी मनात फुलूदेत आता
पहा एक मंदिर म्हण प्रार्थना सोपी
शांतता जन मनास लाभूदेत आता
भेटीले मज ध्यास आजन्म घेतला
भरूनी डोळे मजला पाहूदेत आता
-सत्यजित खारकर

Friday, November 22, 2013

शब्द शब्द सुटा सुटा

शब्द शब्द सुटा सुटा तोडीत बसले
काही शहाणे कविता मोडीत बसले

लग्ने युती अभद्र सत्तेसाठी नव्याने
लाखो भुजंग मुंगुस गोडीत बसले

खोदला पहाडात कुणी रस्ता एकाने
नामर्द कोपऱ्यात खडे फोडीत बसले

कुणी भविष्य देख उराशी कवटाळले
रडे लक्तरे पुराणी जोडीत बसले

जिगरबाज दर्या फिरून सारे आले
कलमबाज तर्र कागदी होडीत बसले

-सत्यजित खारकर

मनस्वी पीर

सौजन्य दाखवताच इथे दुबळे ठरवतात मला
येथे पोंगे पंडीत काही मनसोक्त हसवतात मला

गात धून आपुलीच मनस्वी पीर निघूनी गेला
जिंकले लाख किताब पण ते स्वर हरवतात मला

जिगर ही अशी की झरे फुटावे खड्या फत्तराला
कथा शूर शिवरायाच्या आजही रमवतात मला

कोण म्हणाले उगाच जिभ लावू नये टाळ्याला
या सत्य असत्याच्या धूसर सीमा फसवतात मला

असले कसले कायदे? आम्ही सांगा तुम्ही बदला
झोपलेले न्यायाधीश दोषीच ठरवतात मला
-सत्यजित खारकर

कळ्या


काही-बाही बघ चोरून पाहतात कळ्या
दवांना रोज चुम्बावे चाहतात कळ्या

कुणाचीही आरती कशालाही टाळ्या
फुले असली तरी खुशाल वाहती कळ्या

वेणीत माळता अश्रू पाकळीच्या डोळ्या
करुण वेदना सावळी साहतात कळ्या

लबाड चांद लपे पहा ढगा मागे काळ्या
निळ्या जळात बेफिकीर नाहतात कळ्या

महेफिल संपली उरल्या चार पाकोळ्या
चुरगाळल्या गजर्यात मग दाहतात कळ्या

-सत्यजित खारकर